रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळवणार; चार राज्यांत उमेदवार – ना. रामदास आठवले
पुणे / मुंबई | दि. 23
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री Ramdas Athawale यांनी रिपब्लिकन पक्षाला (आरपीआय) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आगामी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांपैकी चार राज्यांत रिपब्लिकन पक्ष स्वतःचे उमेदवार उभे करणार असल्याची माहिती त्यांनी पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, सचिव बाळासाहेब जानराव, उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्यासह चंद्रकांता सोनाकांबळे, सूर्यकांत वाघमारे, महिपाल वाघमारे, नीलेश अल्हाट, हिमाली कांबळे, निशा मानवतकर, बसवराज गायकवाड, विशाल शेवाळे, जयदेव रंधवे, नीलेश रोकडे, सचिन मानवतकर आणि विरेन साठे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आठवले यांनी सांगितले की, रिपब्लिकन पक्ष हा सर्व जाती-धर्म, उपेक्षित घटक, तरुण आणि महिलांचा सर्वसमावेशक पक्ष आहे. पक्ष अधिक व्यापक करण्यासाठी ठोस प्रयत्न सुरू असून, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये पक्ष उमेदवार उभे करणार आहे.
पक्ष विस्तारासाठी पोर्ट ब्लेअर येथे निवडक कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला जाणार असून, तेथे पुढील धोरण निश्चित केले जाईल. तसेच पुण्यातही पक्ष विस्तारासाठी नियोजन बैठक घेण्यात येणार आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीकडून जागा न मिळाल्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी विधान परिषदेची एक जागा, दोन महामंडळांचे अध्यक्षपद आणि इतर सदस्यपदे देण्याचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, दिवंगत उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या विमान अपघाताबाबत घातपाताची शक्यता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित विमान कंपनीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

भोंदू बाबा प्रकरणावर बोलताना आठवले यांनी राज्यातील अशा सर्व व्यक्तींवर कठोर कारवाईची गरज व्यक्त केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासाठी पुढाकार घेतल्याचेही त्यांनी नमूद केले. कॅप्टन अशोक खरात प्रकरणात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.