लोकसेवा न्यूज
पुणे | प्रतिनिधी
पत्रकारितेसह समाजसेवेचा आदर्श!
पत्रकार उत्कर्ष समितीच्या माध्यमातून ₹31 हजारांचा योगशिक्षक अभ्यासक्रम गरजू विद्यार्थ्यांना मोफत; राज्यस्तरीय वेटलिफ्टर पद्मजा रामदासी यांना योगशिक्षक प्रमाणपत्र प्रदान
पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्यापुरती मर्यादित नसून समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे, याची प्रचिती पत्रकार उत्कर्ष समिती, पुणे सातत्याने देत आहे. समितीचे पदाधिकारी योगगुरू डॉ. धनंजय जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी पत्रकारितेसोबतच सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्रातील गुणी, मेहनती आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रमांतर्गत साधारणपणे ₹31 हजार शुल्क असलेला सहा महिन्यांचा योगा टीचर सर्टिफिकेट कोर्स पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिला जात आहे. या प्रशिक्षणात योगशास्त्र, प्रात्यक्षिक अध्यापन, व्यक्तिमत्त्व विकास, आरोग्यविषयक ज्ञान आणि योग प्रशिक्षक म्हणून आवश्यक असलेली सर्व कौशल्ये विद्यार्थ्यांना आत्मसात करून दिली जातात. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी स्वतःचे योगा क्लास सुरू करून स्वावलंबी होण्याबरोबरच रोजगाराच्या विविध संधीही निर्माण करू शकतात.
समाजातील होतकरू युवक-युवतींना कौशल्याधारित शिक्षण, रोजगार आणि स्वावलंबनाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पत्रकार उत्कर्ष समिती राबवत असलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून विविध स्तरांतून त्याचे कौतुक होत आहे. पत्रकारितेसोबतच शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवा यांचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या कार्याची सर्वत्र प्रशंसा व्यक्त केली जात आहे.
याच उपक्रमाचा लाभ घेत राज्यस्तरीय उत्कृष्ट वेटलिफ्टर कुमारी पद्मजा रामदासी यांनी योगा टीचर सर्टिफिकेट कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला. यानिमित्त आयोजित समारंभात योगगुरू डॉ. धनंजय जगताप यांच्या हस्ते त्यांना योगशिक्षकाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या यशामुळे क्रीडा क्षेत्राबरोबरच योग क्षेत्रातही त्यांची नवी वाटचाल सुरू झाली आहे.