आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष लेख
योग : निरोगी जीवनाचा मंत्र
लेखक : डॉ. रावसाहेब वाघमारे
दरवर्षी २१ जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. भारताच्या प्राचीन संस्कृतीतून उदयास आलेला योग आज संपूर्ण जगाने स्वीकारला आहे. योग म्हणजे केवळ शारीरिक व्यायाम नसून शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधणारी जीवनपद्धती आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनात तणाव, चिंता, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि हृदयविकार यांसारख्या समस्या वाढत आहेत. अशा परिस्थितीत योग हा सर्वात प्रभावी, सुरक्षित आणि नैसर्गिक उपाय ठरतो. नियमित योगाभ्यासामुळे शरीर लवचिक होते, स्नायू मजबूत होतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि मन प्रसन्न राहते.
प्राणायामामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते तसेच शरीराला अधिक प्रमाणात प्राणवायू मिळतो. ध्यानामुळे मानसिक शांतता प्राप्त होते, एकाग्रता वाढते आणि तणाव कमी होतो. योग हा कोणत्याही वयोगटातील व्यक्ती करू शकते. लहान मुले, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी योग अत्यंत उपयुक्त आहे.
भारताने जगाला दिलेली योग ही एक अमूल्य देणगी आहे. आज जगातील अनेक देशांमध्ये योग शिक्षण आणि संशोधन मोठ्या प्रमाणावर केले जात आहे. योगामुळे केवळ रोगांपासून बचाव होत नाही तर जीवनाची गुणवत्ता देखील सुधारते.
या योग दिनानिमित्त प्रत्येकाने नियमित योग, प्राणायाम आणि ध्यान करण्याचा संकल्प करावा. निरोगी शरीर, शांत मन आणि आनंदी जीवनासाठी योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवणे ही काळाची गरज आहे.
“करू योग, राहू निरोग!”
डॉ. रावसाहेब वाघमारे
BNYS, DNYS, DPT, DAT, DAHS
Acupressure Gold Medalist
कार्यकारी संपादक – लोकसेवा न्यूज
संस्थापक – Life Acupressure Academy
पुणे, महाराष्ट्र.
