अक्कलकोट तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट; शेतकऱ्यांमध्ये चिंता
अक्कलकोट | प्रतिनिधी :
अक्कलकोट शहरासह तालुक्यात अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावत अनेक भागांत वादळी वाऱ्यासह गारांचा मारा झाला. संध्याकाळच्या सुमारास सुरू झालेल्या या पावसामुळे वातावरणात मोठा बदल जाणवला.
किरणळी, सांगवी, सलगर, नन्नेगाव, निमगाव, उमरगा परिसर, गौडगाव, चपळगाव, नागणसूर, दोड्याळ आदी भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडला असून काही ठिकाणी गारपीट झाल्याची माहिती मिळाली आहे. अनेक ठिकाणी विजांचा कडकडाटही झाला.
या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून उभ्या पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही भागांत हलका ते मध्यम पाऊस झाला, तर काही ठिकाणी गारांसह जोरदार सरी कोसळल्या.
दरम्यान, प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून नागरिकांनी व शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.