बोरगाव देशमुख येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा अभूतपूर्व जल्लोष
बोरगाव देशमुख (प्रतिनिधी):
बोरगाव देशमुख ग्रामपंचायतीच्या वतीने विश्वरत्न, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अत्यंत उत्साहपूर्ण, भव्य आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. संपूर्ण गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते, तर ग्रामपंचायत परिसर सामाजिक समतेच्या घोषणांनी दुमदुमून गेला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच चन्नप्पा मामा कामशेट्टी, सरपंच विद्या श्याम स्वामी, तंटामुक्त समिती अध्यक्ष गुंडाप्पा गावडे, पोलीस पाटील अभिजीत पाटील, युवा नेते अनिल जिरगे, वीरभद्र स्वामी, सिद्धाराम किवडे, दत्ता जिरगे, ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण बनसोडे, रोहिदास गायकवाड, महसूल कोतवाल मुलगे साहेब, मौला मुजावर, माजी उपसरपंच तसेच आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार विठ्ठलराव वाघमारे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनप्रवासावर प्रभावी व मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. त्यांनी शिक्षण, समानता, न्याय व बंधुता या तत्वांचा समाजात प्रसार करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या ओजस्वी भाषणाने उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
हा भव्य कार्यक्रम बोरगाव देशमुखच्या सामाजिक ऐक्य, एकात्मता आणि प्रगतिशील विचारांचे प्रतीक ठरला.
कार्यक्रमादरम्यान “जय भीम” च्या घोषणांनी परिसर दुमदुमला. युवक-युवतींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. शेवटी सर्व उपस्थितांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे आचरण करण्याचा व समाज प्रबोधनासाठी कार्य करण्याचा दृढ संकल्प व्यक्त केला.
