मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन
पुणे : आषाढी वारी सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते पालखीची विधिवत पूजा करण्यात आली.
मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या सर्व वारकरी बांधवांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महापौर मंजुषा नागपुरे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार हेमंत रासने, विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजन नाथ तसेच पालखी विठ्ठल मंदिर संस्थेचे विश्वस्त उपस्थित होते.
गुरुवारी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पालखी विठ्ठल मंदिरात भक्तिमय वातावरणात आगमन झाले.
मंदिर परिसरात मोठ्या संख्येने वारकरी व भाविक उपस्थित होते. विठ्ठल नामाचा गजर, “ज्ञानोबा तुकाराम”च्या जयघोषात आणि टाळ-मृदुंगाच्या निनादात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.