लोकसेवा न्यूज
पुणे | प्रतिनिधी
पत्रकारितेसह समाजसेवेचा आदर्श! ₹31 हजारांचा योगशिक्षक अभ्यासक्रम गरजू विद्यार्थ्यांना मोफत; राज्यस्तरीय वेटलिफ्टर पद्मजा रामदासी यांना योगशिक्षक प्रमाणपत्र प्रदान
पत्रकार उत्कर्ष समिती, पुणेचे पदाधिकारी, योगगुरू डॉ. धनंजय जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी पत्रकारितेबरोबरच समाजसेवेचेही एक आदर्श उदाहरण निर्माण केले आहे. समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गुणी, मेहनती व आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना ₹31 हजार मूल्याचा सहा महिन्यांचा योगशिक्षक सर्टिफिकेट कोर्स पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिला जात आहे.
या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना योगाचे सखोल सैद्धांतिक व प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाते. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी प्रमाणित योगशिक्षक म्हणून स्वतःचे योगा क्लासेस सुरू करून स्वावलंबी होऊ शकतात तसेच रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण करू शकतात.
या उपक्रमांतर्गत कु. पद्मजा रामदासी, या राज्यस्तरीय उत्कृष्ट वेटलिफ्टरने योगशिक्षक सर्टिफिकेट कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात तिला मान्यवरांच्या हस्ते योगशिक्षक प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. उपस्थितांनी तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत समितीच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक केले.
फोटो कॅप्शन :
राज्यस्तरीय वेटलिफ्टर कु. पद्मजा रामदासी यांना योगगुरू डॉ. धनंजय जगताप व मान्यवरांच्या हस्ते योगशिक्षक सर्टिफिकेट प्रदान करताना.
पत्रकारितेसोबत शिक्षण, कौशल्यविकास आणि स्वावलंबनासाठी राबविण्यात येणारे पत्रकार उत्कर्ष समितीचे हे कार्य अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
