सोलापूरचे नवनियुक्त जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन
पंढरपूर, दि. ०४ :
सोलापूर जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी आज सपत्नीक पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे भाविकतेने दर्शन घेतले.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने सदस्या शकुंतलाताई नडगिरे व नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांचा उपरणे व श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन सत्कार केला.
याप्रसंगी प्रांताधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे तसेच मंदिर समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले उपस्थित होते.
कार्तिकेयन एस. हे भारतीय प्रशासकीय सेवेतील २०२० बॅचचे (IAS) महाराष्ट्र केडरचे अधिकारी असून, यापूर्वी ते कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. सोलापूर जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी पंढरपूर येथे भेट देऊन श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.
दरम्यान, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या संवर्धन व जीर्णोद्धाराची कामे पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, त्याबाबतची माहितीही जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी घेतली. मंदिर समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले यांनी सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा यावेळी सादर केला.

तसेच, पंढरपूर तालुका प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी पुष्पगुच्छ देऊन नवनियुक्त जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार केला.