श्री. विजयकुमार हरिश्चंद्र थोरात यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

श्री. विजयकुमार हरिश्चंद्र थोरात यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

लोकसेवा न्यूज प्रतिनिधी – विठ्ठलराव वाघमारे

बोरगाव (दे.) ता. अक्कलकोट येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. विजयकुमार हरिश्चंद्र थोरात यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित सन्मान सोहळा दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडला.

कार्यक्रमास केंद्रप्रमुख करपे साहेब, माजी केंद्रप्रमुख बा.ना. चव्हाण साहेब, संघटनेचे नेते व माजी सरपंच विलासराव सुरवसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षकवृंद, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्री. थोरात यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. आपल्या दीर्घ सेवाकाळात त्यांनी शाळेची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्याचा मान्यवरांनी विशेष उल्लेख केला. त्यांच्या शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष व विद्यार्थ्यांप्रती जिव्हाळ्याच्या स्वभावामुळे त्यांनी शिक्षण क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केल्याचे वक्त्यांनी नमूद केले.

मनोगतात श्री. थोरात यांनी सहकारी शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे आभार मानत शिक्षण हीच समाजपरिवर्तनाची खरी ताकद असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय ठेवून प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत, असा संदेश त्यांनी दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक प्रतिनिधींनी केले तर आभार प्रदर्शन शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी केले. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात श्री. थोरात यांना निरोगी, आनंदी व यशस्वी पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत कार्यक्रमाची सांगता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *