सोलापूरचा आवाज – सत्ता परिवर्तनाची नांदी, वंचित बहुजन आघाडीचं आवाहन!
लोकसेवा न्यूज प्रतिनिधी, सोलापूर
सोलापूर : एकेकाळी देशभर प्रसिद्ध असलेली सोलापूरची चादर उद्योगधंद्यांच्या पडझडीमुळे आज अस्तित्वासाठी झगडत आहे. टेक्स्टाईल इंडस्ट्री बंद पडल्याने हजारो कामगारांच्या हातातील रोजगार गेला आहे. जिल्ह्यात दरवर्षी सुमारे 70 हजार तरुण शिक्षण घेऊन बाहेर पडतात, मात्र स्थानिक पातळीवर केवळ 10 हजार नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत, अशी खंत युवा नेते सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केली.
सुजात आंबेडकर यांनी स्वाभिमानी एल्गार जनसभात उपस्थितांना संबोधित करत म्हटले, “ही परिस्थिती बदलायची असेल, तर ज्यांनी रोजगार हिरावला आणि विकास रोखला, त्या प्रस्थापित नेत्यांना घरी बसवा आणि सत्ता आता वंचित बहुजन आघाडीच्या हातात द्या. सोलापूरच्या तरुणांनी नेतृत्व घ्यावे आणि नवा परिवर्तनाचा इतिहास घडवावा.”
सभेला मोठ्या संख्येने तरुण, महिला आणि समाजबांधव उपस्थित होते. या सभेत रोजगार, विकास आणि सामाजिक न्याय यावर भर देत स्थानिक नेतृत्वाच्या गरजेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.