एकादशीचे औचित्य साधत पत्रकार उत्कर्ष समितीकडून आपुलकी वृद्धाश्रमात फराळ वाटप
आळंदी, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पत्रकार उत्कर्ष समिती यांच्या वतीने आळंदी येथील आपुलकी वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी फराळ वाटपाचा सेवाभावी उपक्रम आयोजित करण्यात आला. सामाजिक बांधिलकी आणि मानवसेवेची भावना जपत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हा उपक्रम उत्साहात पार पाडला.
यावेळी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना फराळाचे वाटप करून त्यांच्याशी आत्मीयतेने संवाद साधण्यात आला. उपस्थितांनी ज्येष्ठांना एकादशीच्या शुभेच्छा देत त्यांच्या उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. या उपक्रमामुळे वृद्धाश्रमातील वातावरण आनंदमय झाले.
पत्रकारिता ही केवळ बातमी देण्यापुरती मर्यादित नसून समाजाप्रती असलेली जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. त्याच भावनेतून पत्रकार उत्कर्ष समितीने राबविलेल्या या सेवाभावी उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी पत्रकार उत्कर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष अरविंद येवले, जिल्हा सचिव डॉ. धनंजय जगताप, जिल्हा सदस्य अमित कुंभार तसेच जिल्हा पदाधिकारी महिंद्र बोराडे उपस्थित होते. समाजातील गरजू व ज्येष्ठ नागरिकांप्रती आपुलकी व्यक्त करणारा हा उपक्रम उपस्थितांकडून कौतुकास्पद ठरला.