लोकसेवा न्यूज

“राज्यातील शेतकऱ्यांना ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफी — मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा”

नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांना ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. शेतकरी कर्जमाफीसंदर्भात आंदोलक प्रतिनिधी शिष्टमंडळासोबत सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.

मुख्यमंत्री म्हणाले की, कर्जमाफीसाठी गठीत समिती एप्रिल २०२६ पर्यंत शिफारस करेल. त्यानंतर तीन महिन्यांत म्हणजे ३० जूनपर्यंत कर्जमाफी अमलात आणली जाईल. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी ३२ हजार कोटींच्या मदतपॅकेजची अंमलबजावणी सुरू आहे. आतापर्यंत ८ हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून या आठवड्याअखेर आणखी १८,५०० कोटी रुपये दिले जाणार आहेत. पुढील पंधरवड्यात ९० टक्के शेतकऱ्यांना मदत पोहोचेल, असे त्यांनी सांगितले.

या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पणन मंत्री जयकुमार रावल, तसेच शेतकरी नेते ओमप्रकाश बच्चू कडू, राजू शेट्टी, महादेव जानकर, वामनराव चटप, रविकांत तुपकर, राजन क्षीरसागर, गिरीश दाभाडकर आणि अजित नवले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शेतकरीकर्जमाफी #MaharashtraNews #LoksevaNews

Exit mobile version