लोकसेवा न्यूज

बोरगाव परिसरातील पूल उंची वाढविण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा – पालकमंत्री व आमदारांचा दिलासा

बोरगाव परिसरातील पूल उंची वाढविण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा – पालकमंत्री व आमदारांचा दिलासा**

अक्कलकोट (प्रतिनिधी – लोकसेवा न्यूज, डॉ. रावसाहेब वाघमारे):
अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव परिसरातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करताना बोरगाव-घोळसगाव पूल तसेच बादोला-बोरगाव पूल यांची उंची अपुरी असल्याचे निदर्शनास आले. पावसाळ्यात येणाऱ्या पाण्याच्या प्रचंड लोंढ्यामुळे वाहतूक विस्कळीत होत असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले.

या संदर्भात माननीय पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी घटनास्थळी हजेरी लावून ग्रामस्थांना आश्वासन दिले की, या दोन्ही पुलांच्या उंची वाढविण्याचा प्रस्ताव तातडीने शासनस्तरावर पाठविला जाईल आणि त्यासाठी आवश्यक निधीची मागणी केली जाईल.

शेतकऱ्यांना दिलासा देत आमदार कल्याणशेट्टी म्हणाले, “तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ओला दुष्काळ जाहीर व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठोस पाठपुरावा केला जाईल.”

ग्रामस्थांनी या पाहणी दौऱ्यात आमदारांच्या तातडीच्या उपस्थितीचे आणि प्रतिसादाचे कौतुक केले. “संकटाच्या काळात आपला आमदार नेहमी जनतेसोबत उभा राहतो, याची प्रचिती पुन्हा आली,” असे ग्रामस्थांनी नमूद केले.

या पाहणी दौऱ्यास जिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरपरिषद उपनगराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, मंडळ अध्यक्ष तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version