निराधाराची माय जनसेवा फाउंडेशन डॉ. भाग्यश्री वैद्य

निराधारांची माय जनसेवा फाउंडेशन _डॉ. भाग्यश्री वैद्य

पुणे प्रतिनिधी:लहान मुलांना सगळ्यात सुरक्षित वाटणारी जागा म्हणजे त्यांच्या आई-वडिलांची कुशी. अंधाराची भीती वाटली, खेळताना खाली पडले, कोणासोबत भांडण झालं किंवा साधी ताप सर्दी झाली ही प्रत्येक मुलांना आईच्या कुशीत आलं की स्वर्ग भेटण्याचा आनंद होतो व त्यांची भीती, आजार कुठल्या कुठे पळून जातात. अशी ही जादूची झप्पी सगळ्यांच्या सगळ्याच लहान मुलांच्या नशिबात असते का हो?  मनावर दगड ठेवून सांगाव लागत आहे की नाही. सगळ्यांचे नशिबात हे स्वर्गसुख किंवा जादूची झप्पी नसते.

मी डॉक्टर भाग्यश्री वैद्य डिवाइन योगा अकॅडमीची संस्थापक काही महिन्यांपूर्वी पुण्यातील खडकवासला जवळील अंबी येथील जनसेवा वृद्धाश्रमामध्ये भेट देण्याचा योग आला. ही जनसेवा फाउंडेशन संस्था डॉ. विनोद शहा यांनी 1987 ला स्थापन केलेली आहे. आंबी येथील वृद्धाश्रमाला 37 वर्ष पूर्ण झालेली आहेत. सौ शहा भाभी तिथल्या ट्रस्टी आहेत आणि हा जनसेवा परिवार तेथील वृद्धांची काळजी घेण्यासाठी कायम सज्ज, तत्पर असतात.
या वृद्धाश्रमाचा परिसर अतिशय भव्य सुंदर आणि स्वच्छ आहे. आम्ही त्या वृद्धाश्रमामध्ये प्रवेश करताच मोठी मोठी हिरवीगार झाड, प्रसन्न वातावरण, भल्या मोठ्या दोन-तीन इमारती दिसल्या आणि आम्ही तिथेच थांबलो. त्यातील पहिली इमारत होती वृद्धांसाठी भल मोठे हॉस्पिटल. त्या हॉस्पिटलमध्ये सर्व वृद्धांना सर्दी खोकल्यापासून ते डोळ्याच्या ऑपरेशन पर्यंतच्या सर्व सुख सोयी उपलब्ध आहेत. आणि त्याला लागूनच दोन इमारती होत्या त्या म्हणजे वृद्धांसाठी असलेला निवासस्थान. समोरच मोठा डायनिंग हॉल होता. त्याला लागूनच भव्य, स्वच्छ सुंदर असं स्वयंपाक घर आणि त्या स्वयंपाक गृहात आनंदाने, आत्मीयतेने अन्न शिजवणाऱ्या सुगरणी. ज्यांच्या हातचं चविष्ट अन्न खाऊन तेथील आजी आजोबा निरोगी व आनंदी राहतात.
आम्ही तिथे गेल्यावर सगळ्या आजी खूप खुश झाल्या. आपल्या घरी आलेल्या पाहुण्याला कुठे ठेवू व कुठे नको असं त्यांना झालं होतं त्यांच्यासोबत तीन-चार तासांचा वेळ कसा गेला कळालच नाही. त्यांच्यासोबत जेवण केलं, भरपूर गप्पा मारल्या, मनातील भावनांची देवाण-घेवाण केली, गाणे म्हटले छान फोटो सेशनही झाले. परत जाताना मात्र त्यांचे डोळे पाणावले होते… परत ये बर का ग!… येशील ना नक्की!… वाट बघतो तुमची.. बापरे.. हे वाक्य ऐकताच माझ्या पोटात गोळाच आला. आम्ही तिथे गेल्यामुळे करोडोची संपत्ती मिळाल्याचा आनंद त्यांना झाला होता. त्यातील काहींची डॉक्टर होत्या, मुख्याध्यापिका होत्या, शिक्षक होत्या पण आज त्यांच्याजवळ त्यांचं असं कोणीच नव्हतं. आयुष्याचा अंतिम सत्य काय आहे ते तिथे जाणवत होत.
त्याच ठिकाणी तिथल्या व्यवस्थापक सोनाली ताई यांच्याकडून सौ पटेल भाभी चा संदर्भ भेटला. ज्या जनसेवा फाउंडेशनच्या ट्रस्टी आहेत आणि पटेल भाभी कडून भिलारवाडीला निराधार केंद्र असल्याचे कळाले. तेव्हापासून तिथे जाण्याचे मानस होतl मात्र योगच येत नव्हता.
तीन डिसेंबरला डिवाइन योगाचा वर्धापन दिन असतो तेव्हा मनामध्ये पक्क होतं की हा दिवस आपण निराधार अनाथ मुलांना योगा प्राणायाम नैतिक मूल्य शिकवून साजरा करायचा. त्यादिवशी सकाळी साडेसात वाजता भिल्लार वाढीच्या निसर्गरम्य वातावरणातून जनसेवा निराधार केंद्रामध्ये पोहोचलो. हा निराधार आश्रम गेल्या 23 वर्षापासून निराधार मुलांसाठी सज्ज आहे.
आमची गाडी पार्किंगला लावतच होते की जोरजोरात लहान मुलांचा आवाज येत होता ताई आल्या वाटतं… लवकर या सगळे, ताई आल्या. मी आणि आमची डिवाइन ची टीम येतात सगळे लहान मुलं आमच्या भोवती गोळा झाले. ताई तूच आम्हाला योगा शिकवणार ना आज? असं म्हणत एक चिमुरडी माझ्याजवळ आली. मी तिला जवळ घेतलं आणि हो म्हणाले की सगळेच मुलं मग आमच्याकडे पळत आले. सगळेजण छान स्नान करून, पावडर लावून, केस विंचुरून योगा करण्यासाठी तयार होऊन आमची वाट पाहत होते.
मग तेथील संस्थापक ताई आल्या व त्यांनी आम्हाला पूर्ण आश्रम दाखवला. अतिशय सुंदर व्यवस्थित सोय होती तिथे. स्वयंपाकघर पण स्वच्छ आणि भव्य होतं. तिथल्या डायनिंग हॉलमध्ये काही पीलवंड नाश्ता करत बसली होती. एक छोटीशी साडेतीन वर्षाची चिमुकली तिच्या अडीच वर्षाच्या भावाला घास भरवत होती. तेव्हा तिच्याकडे पाहून तिथल्या संस्थापक ताईने सांगितलं, गेल्या महिन्यात पुणे बस स्थानकावर या मुलांना त्यांची आई सोडून गेली. आता येते म्हणून गेली व परत आलीच नाही. तिथल्या पोलिसांनी सगळी चौकशी करून शेवटी जनसेवा निराधार केंद्रामध्ये या मुलांना आणून सोडले. तो लहान मुलगा त्याच्या बहिणीला गच्च मिठी मारून बसला होता. हे सगळं पाहून पोटात गोळा आला व डोळेही सारखे पानावत होते. असे कितीतरी विविध ठिकाणी सापडलेले लहान मुलं यां निराधार केंद्रामध्ये आहेत. जे सिंगल पेरेंट आहेत आणि त्यांना मुल सांभाळणं शक्य नाही अशांनीही त्यांची मुलं इथे ठेवलेली आहेत. अशी एकूण 130 निराधार मुलं या केंद्रामध्ये एकत्र राहतात.
त्या मुलांसोबत काही सोळा सतरा वर्षाच्या युवती पण आहेत. त्यांनाही येथे नरसिंग कोर्स फ्री शिकवला जातो. कारण या मुली मोठ्या होऊन स्वतःच्या पायावर उभ्या रहाव्यात. या सगळ्या वयोगटातील मुला मुलींसोबत योगा, प्राणायाम, नाच, ध्यान करायला खूप मज्जा आली. त्यांचा आनंद पाहून मनामध्ये खूप समाधान वाटत होतं.
अजून एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे इथल्या सर्व मुलांचे एक दोन महिन्याला दातांची तपासणी व इतर तपासणी केली जाते. त्याप्रमाणे त्यांना उपचारही दिला जातात. इतका मोठा व्याप सांभाळणं सोपं नाहीये. खरंच खूप कौतुक वाटतं डॉक्टर विनोद शहा सर आणि सर्व जनसेवा फाउंडेशन परिवाराच की आपल्या दगदगीच्या जीवनामध्ये नैतिकतेचा वारसा निस्वार्थीपणे चालवत आहेत. माणसा मधल देव पण काय असतं ते या सगळ्यांकडे पाहून कळते.
जनसेवा फाउंडेशन परिवाराचे खूप खूप कौतुक आणि पुढील कार्यासाठी खूप शुभेच्छा.

      *डॉ. भाग्यश्री वैद्य. पुणे*
   *Diiviine Yoga Academy*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *