लोकसेवा न्यूज

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती यंदा अधिक भव्य स्वरूपात साजरी होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अधिक भव्य स्वरूपात साजरी होणार

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त होणारा कार्यक्रम दरवर्षी अधिक उत्कृष्ट करण्याचा शासनाचा प्रयत्न असून, यंदाही तो अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. जयंतीचा सोहळा त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, महापुरुषांच्या जयंती साजरी करण्यामागील उद्देश केवळ औपचारिकता नसून त्यांच्या विचारांची प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणे हा आहे. डॉ. आंबेडकरांनी दिलेले संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधानांपैकी एक असून, त्यातील समावेशकतेच्या तत्त्वामुळे भारत विकसित राष्ट्राकडे वाटचाल करत आहे.

जयंतीनिमित्त चैत्यभूमी परिसरात येणाऱ्या नागरिकांसाठी आवश्यक सोयीसुविधांची व्यापक व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले. उष्णतेपासून संरक्षणासाठी मंडप उभारणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी योग्य नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले.

यासोबतच नागरिकांना मार्गदर्शनासाठी सूचना फलक लावणे, तसेच दादर रेल्वे स्थानक ते चैत्यभूमी दरम्यान बेस्टकडून अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती देशासह जगभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. हा सोहळा अधिक उत्तम पद्धतीने पार पाडण्याची जबाबदारी प्रशासनाची असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

या वेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पोस्टरचेही विमोचन करण्यात आले.

Exit mobile version