मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांचे दर्शन; बाराबंदी पोशाखात केले संबोधन, सोलापूरकरांची जिंकली मने
सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सोलापूरमध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ विजय संकल्प सभेसाठी उपस्थिती दर्शविली. सभेपूर्वी त्यांनी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
मुख्यमंत्र्यांनी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील पारंपारिक बाराबंदी पोशाख परिधान करून सोलापूरकरांना संबोधित केले. या अनोख्या कृतीमुळे सोलापूरकरांची मने जिंकली गेली.
सभेपूर्वी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. या ठिकाणी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी त्यांचे स्वागत केले. मंदिराच्या गाभाऱ्यात त्यांनी विधिवत पूजा केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोबत पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, विश्वस्त सिद्धेश्वर बमणी, ऍड. आर. एस. पाटील, मल्लिनाथ मसरे, शिवकुमार पाटील, सोमशंकर देशमुख, डॉ. राजेंद्र घुली, नीलकंठ कोनापुरे, विश्वनाथ लब्बा, मल्लिकार्जुन कळके, सी. बी. नाडगौडा, गुरु माळगे, प्रभुराज मैंदर्गीकर, रतन रिक्के, कुंभार आदी उपस्थित होते.
सभेत भाषण करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “पुढील ५ वर्षे सोलापूरकरांच्या सेवेची संधी आम्हाला द्यावी, अशी प्रार्थना मी श्री सिद्धरामेश्वर महाराजांकडे केली आहे. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांचा आशीर्वाद मिळाला की मागे वळून पहावे लागत नाही.”

यावेळी सोलापूर शहर भाजपा तर्फे त्यांना नंदीध्वज आणि बाराबंदी परिधान केलेल्या भक्तांची प्रतिकृती भेट स्वरूपात दिली. व्यासपीठावर असलेली ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांची भव्य मूर्ती, मुख्यमंत्री फडणवीस यांचा बाराबंदी पोशाख, नंदीध्वजाची प्रतिकृती आणि ‘एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र, श्री सिद्धेश्वर महाराज की जय’ असा जयघोष यामुळे वातावरण भक्तीमय झाले.
