दिल्ली येथे आरोग्यदूत मंगेश चिवटे यांना ‘अटल पुरस्कार’ प्रदान
केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते सन्मान
नवी दिल्ली | प्रतिनिधी
समाजकार्य, जनसेवा तसेच वैद्यकीय मदत क्षेत्रातील उल्लेखनीय आणि निस्वार्थ कार्याची दखल घेत आरोग्यदूत मंगेश चिवटे यांना नवी दिल्ली येथे प्रतिष्ठित ‘अटल पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. अटल फाउंडेशनच्या वतीने आयोजित भव्य आंतरराष्ट्रीय अटल पुरस्कार व अटल श्री पुरस्कार वितरण समारंभात, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. श्री. नितीनजी गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा सन्मान सोहळा महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे अत्यंत मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. अटल फाउंडेशनकडून प्राप्त झालेल्या अधिकृत पत्रानुसार, समाजकार्य, जनसेवा आणि वैद्यकीय मदत क्षेत्रात मंगेश चिवटे यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
गेल्या अनेक वर्षांपासून मंगेश चिवटे हे सर्वसामान्य व गरजू नागरिकांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून हजारो रुग्णांना उपचार, शस्त्रक्रिया तसेच आर्थिक सहाय्य मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. कोणताही भेदभाव न करता, निस्वार्थ भावनेने रुग्णसेवा हीच आपली ओळख त्यांनी निर्माण केली आहे.
अटल फाउंडेशनच्या आमंत्रण पत्रात नमूद केल्याप्रमाणे, मंगेश चिवटे यांचे कार्य संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी असून त्यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव म्हणून त्यांना ‘अटल श्री पुरस्कार’ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा सन्मान प्रत्यक्षात येताच त्यांच्या समर्थकांमध्ये, सहकाऱ्यांमध्ये तसेच रुग्णसेवकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
पुरस्कार स्वीकारताना मंगेश चिवटे यांनी हा सन्मान भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारांना समर्पित करत,
“हा पुरस्कार माझा वैयक्तिक नसून माझ्यासोबत रुग्णसेवेत झटणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आणि प्रत्येक गरजू रुग्णाचा आहे,” अशी भावना व्यक्त केली.
या गौरवामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात रुग्णसेवा व समाजकार्य क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना नवी प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.