पुण्याच्या वाहतूक कोंडीवर मोठा उपाय; तीन उन्नत महामार्गांचे भूमिपूजन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकल्पांना सुरुवात
पुणे : पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि भविष्यातील वाढत्या गरजा लक्षात घेऊन राज्यातील महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुण्यातील तीन महत्त्वपूर्ण उन्नत महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले.
यामध्ये पुणे-शिरूर उन्नत द्रुतगती महामार्ग, तळेगाव-चाकण-शिक्रापूर उन्नत महामार्ग आणि हडपसर-यवत उन्नत महामार्ग या तीन प्रकल्पांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, या तीन महामार्गांचे भूमिपूजन हे पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. पुण्याबाहेरील औद्योगिक वसाहतींना जोडणाऱ्या मार्गांवरील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी हे प्रकल्प उपयुक्त ठरणार आहेत.
या प्रकल्पांसाठी प्रथमच बिल्ड-ऑपरेट-ट्रान्सफर (BOT) या आधुनिक पद्धतीचा वापर करण्यात येत आहे. या माध्यमातून सरकारला अतिरिक्त निधी उपलब्ध होणार असून भूसंपादन आणि विकासकामांना मोठी मदत होणार आहे.
पुणे-शिरूर उन्नत महामार्गाची लांबी 53.4 किमी असून त्यातील 35 किमीचा उन्नत मार्ग विकसित केला जाणार आहे. या मार्गाखाली चार पदरी सेवा रस्ता असणार आहे.
तळेगाव-चाकण-शिक्रापूर उन्नत महामार्ग 53.20 किमी लांबीचा असून त्यातील 26 किमीचा भाग उन्नत स्वरूपाचा असेल.
हडपसर-यवत महामार्ग 31 किमी लांबीचा असून सहा पदरी उन्नत मार्ग आणि सहा पदरी जमिनीवरील रस्ता विकसित करण्यात येणार आहे.
या तिन्ही प्रकल्पांमुळे प्रवासाचा वेळ कमी होणार असून इंधनाची बचत आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. पुणे-शिरूर आणि हडपसर-यवत मार्गावर एलिव्हेटेड रोडसह भविष्यात मेट्रो जोडणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेलाही मोठी चालना मिळणार आहे.
पुणे हे अभियांत्रिकी, स्टार्टअप आणि डीप टेक क्षेत्रातील प्रमुख केंद्र म्हणून विकसित होत असून, या नव्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे पुण्याच्या विकासाला आणखी वेग मिळणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुरंदर विमानतळ, पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या भविष्यातील गरजा, पाणीपुरवठा, सांडपाणी प्रक्रिया आणि समान पाणीवाटप यासाठी दीर्घकालीन नियोजन सुरू असल्याचे सांगितले.